
मुंबई- शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत व विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यादरम्यान झालेल्या भेटीमुळे महाराष्ट्रात राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. या भेटीनंतर राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता असल्यामुळे काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली होती.
शरद पवार यांच्यासोबत झालेल्या भेटीनंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सेना आमदारांसोबत चर्चा केल्याने राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शिवसेना नेते अनिल परब यांनी घडलेल्या.
घडामोडींबाबत वक्तव्य केलं आहे. परब यांनी, ‘महाविकास आघाडीत कुठेही अस्वस्थता नाही, शरद पवार महाविकास आघाडीचे मार्गदर्शक आहेत,राज्यासमोर जे प्रश्न येतात त्याबद्दल त्यांची भेट होत असतेच.’ सर्वकाही ठीक असल्याबाबत माहिती दिली.
मुख्यमंत्र्यानी सेने आमदारांसोबत चर्चेबाबत बोलताना परब यांनी, ‘महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांशी मुख्यमंत्री बोलणार आहेत, कोणत्या कामाला प्राधान्य दिलं पाहिजे, आश्वासनं कशी पूर्ण करायची, आमदारांशी बोलून त्यांच्या मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत, आमचा वचननामा आहे तो पूर्ण करण्याच्या दृष्टीकोनातून मुख्यमंत्री आमदारांशी चर्चा करत आहेत. महाराष्ट्रासमोरील प्रश्न जाणून तो सोडवण्याबाबत मुख्यमंत्री प्रयत्नशील आहेत.’ असा दावा परब यांनी केला.