भाजपाचे कार्यकर्ते देखील कांदा निर्यातीच्या निर्णयाच्या विरोधात

पारनेर – सरकारने जे कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतलेला असुन सदर निर्णयाचे विरोधात शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे. मागील काळामध्ये कांद्याचे बाजारभाव ५-६ रु एवढे खाली आले असताना शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले,असुन केंद्र आणि राज्य शासनाकडून कांद्याच्या संदर्भात कुठल्याही प्रकारची मदत मिळालेली नाही.
असे असून कांद्याचे बाजारभाव नुकतेच काही प्रमाणात वाढलेले असल्याने शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पन्नाची थोडीफार मदत मिळायला सुरुवात झाल्याबरोबर केंद्रशासनाने निर्यातबंदी केल्याने कांद्याचे बाजारभाव पुन्हा कमी व्हायला लागले आहेत.
अशा परिस्थीतीत शेतकऱ्यांचे अर्थकारण पुन्हा अडचणीत येऊ शकते. या कांदानिर्यातीचा सरकारने विचार करावा आणि लवकर हि कांद्याची निर्यात बंदी ऊठवावी अशी मागणी भाजपचे जिल्हापरिषद सदस्य विश्वनाथ कोरडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.