
नवी दिल्ली- बिहार विधानसभेची निवडणूक २८ ऑक्टोबर, ३ आणि ७ नोव्हेंबर अशा तीन टप्प्यांमध्ये होणार असून १० नोव्हेंबर रोजी निकाल घोषित केला जाईल. करोना संकटकाळात देशात होणारी ही पहिली निवडणूक आहे.बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केला.
फेब्रुवारीमध्ये झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर बिहारमधील निवडणूक ही मोठी निवडणूक असेल. लाखो विद्यार्थ्यांनी नीट आणि जेईई परीक्षा दिल्या आहेत. लोकांचे आरोग्य सांभाळून लोकप्रतिनिधींची निवडप्रक्रिया पार पाडण्यासाठी मार्ग काढावा लागत आहे असे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी सांगितले.
जगभरात ७० देशांनी निवडणुका रद्द केल्या असल्याची माहितीही त्यांनी दिली.जागावाटप अनुत्तरित बिहारमधील विधानसभा निवडणुकीत जनता दल (संयुक्त) आणि भाजप यांच्या सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (एनडीए) राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसची महाआघाडी उभी राहिली आहे. नितीशकुमार चौथ्यांदा मुख्यमंत्रिपदावर दावा करत असून त्यासाठी बिहारचा विकास आणि राज्याची अस्मिता या दोन मुद्दय़ांवर प्रामुख्याने प्रचारात भर असेल.
तर महाआघाडीच्या वतीने शेती विधेयके, पूरपरिस्थिती, बेरोजगारी, स्थलांतरित मजुरांचा प्रश्न, करोनाची हाताळणी असे मुद्दे नितीशकुमार यांच्या विरोधात वापरले जातील. एनडीमध्ये रामविलास पासवान यांचा लोकजनशक्ती पक्ष व जितन मांझी यांचा हिंदुस्थान अवामी मोर्चाही सहभागी असेल. त्यामुळे एनडीएतील जागावाटपाचा प्रश्न अजून सुटलेला नाही. गेल्या वेळी २०१५ मध्ये नितीशकुमार यांनी लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाशी आघाडी करून सत्ता मिळवली होती. त्यात लालूंच्या पक्षाला सर्वाधिक ८० जागा मिळाल्या होत्या. जनाता दल ७१, भाजप ५३ तर काँग्रेस २७ जागा मिळाल्या होत्या.