बाजार समितीवर प्रशासकाची नियुक्ती सहाय्यक निबंधक देविदास घोडेचोर यांनी स्विकारला पदभार

जामखेड – कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत १५ सप्टेंबर रोजी समाप्त होताच दि. १६ रोजी सहाय्यक निबंधक देवीदास घोडेचोर यांची प्रशासकपदी नियुक्ती जिल्हा उपनिबंधक यांनी केली आहे. त्यांनी तात्काळ प्रशासक पदाची सूत्रे स्वीकारली आहेत. बाजार समिती भाजपच्या ताब्यात होती.
भाजप नेते व तत्कालीन गृहराज्यमंत्री राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळ कृषी उत्पन्न बाजार समितीवर निवडून आले होते. सलग पाच वर्षे सभापती म्हणून गौतम उतेकर व उपसभापती म्हणून शारदा भोरे यांची निवड बिनविरोध केली होती. बाजार समितीवर एकहाती सत्ता आल्याने मंत्री शिंदे यांनी आपल्या खात्यामार्फत मोठ्या प्रमाणावर निधी आणला होता व विकास कामे झाली होती. परंतु मागील दोन वर्षांपासून संस्थेच्या बैल बाजार भरतो तेथील भूखंड वाटप व इतरत्र बाजार भरवण्याच्या हालचाली व आडत व्यापारी यांचा असहकार यामुळे बाजार समिती चांगलीच चर्चेत आली होती. यामुळे संचालक मंडळात बेबनाव झाला होता परंतु तत्कालीन मंत्री राम शिंदे यांच्या नेतृत्वामुळे बंड झाले नाही.
विद्यमान संचालक मंडळाची मुदत १५ सप्टेंबर रोजी पूर्ण होताच तात्काळ दि. १६ रोजी प्रशासक म्हणून सहाय्यक निबंधक सहकारी संस्था देवीदास घोडेचोर यांची नियुक्ती जिल्हा उपनिबंधक यांनी केली आहे. त्यांनी तात्काळ पदभार घेऊन कामकाजास सुरवात केली आहे.