बाजरीने शेतकऱ्यांना रडवले : हमीभाव खरेदी केंद्र बाजरी घेईना

0 201

जामखेड – तालुक्यात खरीप बाजरी दोन हजार हेक्टर क्षेत्रात सोंगणीचे काम चालू असून बाजारपेठेत मात्र ७०० ते ९०० रूपये प्रति क्विंटल दर असल्याने केलेल्या खर्च तर दूरच पण उत्पादीत झालेली बाजरी घालायची कोठे या विवंचनेत शेतकरी आहेत तर हमीभाव खरेदी केंद्रावर बाजरीला २१५० रूपये दर आहे परंतु तिथे ती खरेदी केली जात नाही यामुळे शेतकरी अर्थीक संकटात सापडला असून रब्बी हंगाम कसा करावा या काळजीत शेतकरी आहे. मध्यप्रदेश येथून गहू, मका व बाजरी मोठ्या प्रमाणावर आली असून दर पडल्याचे व्यापारी सांगतात. 


तालुक्यात दोन हजार हेक्टर क्षेत्रावरील बाजरी काढण्याचे काम चालू आहे पण बाजार समितीत सध्या जुनाच माल मोठ्या प्रमाणावर येत आहे. त्यामुळे बाजरीचे दर प्रचंड प्रमाणात घसरले असून ७०० ते ९०० क्विंटल दर आहे.  बाजरीला शासनाचा हमीभाव २१५० रूपये प्रति क्विंटल आहे. शासनाचे हमीभाव खरेदी केंद्रावर बाजरी आणावी तर तेथे बाजरी घेतली जात नाही त्याबाबत आदेश नसल्याचे केंद्रचालक सांगतात. त्यामुळे उत्पादीत बाजरीचे करायचे काय ? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे यामुळे शेतकरी रडकुंडीला आले आहे.  यावर्षी वेळेवर पाऊस झाला यामुळे खरीप पिकांनी शेतकऱ्यांना आधार दिला आहे त्यातच काही भागात अतिवृष्टी झाल्याने पिके पाण्यात आहे.

Related Posts
1 of 2,047

जामखेड व कर्जत पट्ट्यात खरीप पेरणी लवकर होतात त्यामुळे ९० दिवसात पिके काढली जातात. परंतु ज्यावेळी शेतकऱ्यांचा माल बाजारपेठत येतो त्यावेळी त्याला कमी भाव मिळतो तर हमीभाव खरेदी केंद्र राज्याच्या सर्व भागाचा विचार करून आँक्टोबर मध्ये चालू होतात तोपर्यंत नोंदणी प्रक्रिया चालू राहते.


     जामखेड तालुक्यात खरीपाच्या ११० टक्के पेरण्या झाल्या त्यामध्ये बाजरी दोन हजार हेक्टर, मुग, मका दोन हजार हेक्टर, उडीद ३६ हजार हेक्टर, तुर तीन हजार हेक्टर इतर कडधान्ये सहा हजार हेक्टर अशी विक्रमी लागवड झाली आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळावा म्हणून उडीद व तुर सहा हजार, बाजरी २१५०, मका १८५०,मुग ७१९६ असे हमीभाव ठरवून दिले आहे. परंतु प्रत्यक्षात हमीभाव खरेदी केंद्र १ आँक्टोबरला चालू होणार आहे. खरीप बाजरी उत्पादन मोठय़ा प्रमाणावर झाल्यामुळे बाजारपेठेत त्याचे दर सातशे ते नऊशे रूपयाच्या आसपास आहे व शासनाचा हमीभाव २१५० रूपये क्विंटल आहे त्यामुळे  हमीभाव खरेदी केंद्रावर बाजरी घेण्यात यावी अशी मागणी शरद ढवळे, ज्ञानदेव ढवळे, प्रदीप दळवी, अशोक पठाडे, रवींद्र ढवळे यांनी आ. रोहीत पवार यांच्याकडे केली असता आपण संबधीत फेडरेशन बरोबर चर्चा करून बाजरी हमीभाव खरेदी करण्यासाठी परवानगी मिळवून देण्याची ग्वाही आ. पवार यांनी दिली.

    सध्या बाजारात जुनी बाजरी मोठ्या प्रमाणावर येत आहे तसेच नवीन उत्पादन येत आहे त्यातच मध्यप्रदेश येथून गहू, मका व बाजरी चांगल्या दर्जाची व कमी किमतीत मिळत आहे त्यामुळे दर उतरले असून बाजरीला ७०० ते ९०० रूपये व मका हजार ते अकराशे रूपये चालू आहे याचा मोठा तोटा शेतकऱ्यांना होत आहे. उडीदाला ६७०० रूपये दर आहे तो हमीभाव पेक्षा जास्त आहे. -रमेश जरे ,अध्यक्ष व्यापारी असोसिएशन जामखेड

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: