पाथर्डी तालुक्यातील संततधारेने शेतमालाचे नुकसान

पाथर्डी – तालुक्यात गेल्या आठ दिवसापासून सुरु असलेल्या संततधार पाऊसामुळे नदीनाले तुडुंब झाले असून उभ्या पिकात पाऊसाचे पाणी साचेले असून कापणी करून मळणीसाठी तयार असलेल्या पिकांना मोड येवून शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.
दोन दिवसात महसुली मंडळ पाथर्डी ४५,माणिकदौंडी २०,मिरी ३३,करंजी १७,कोरडगाव ६५,टाकळीमानूर ६० याप्रमाणे एकूण २२६ मिली मीटर पाऊसाची नोंद झाली आहे.
मोहरी,शिरसाटवाडी,घाटशीळपारगाव,कुतरवाडी,येळी,जांभळी,पिंपळगावटप्पा,मिडसांगवी,करोडी,कोकीपीर तांडा या ठिकानचे तलाव पूर्ण क्षमतेने भरले असून तालुक्यातील करंजी,घाटशिरस या पट्ट्यातील पश्चिम भाग वगळता तालुकाभर गेल्या आठ दिवसात अती वृष्टी झाल्याने शेती मालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
संततधार पाऊसामुळे गावोगावच्या रस्त्यांची खड्डे पडून चाळणी झाली असून शेतात कापणीसाठी तसेच कापणी होवून मळणीसाठी तयार असलेल्या बाजरीच्या कणसाला भिजपाऊसाने कोंब फुटले आहेत,कपाशी पिकात पाणी साठल्याने शेकडो एकरातील कपाशीचे मुळे सडल्याने सुकून गेली आहे,उडीद,मुग हावरी असे पिके पाऊसाने भिजल्याने बुरशी लागून खाण्यास अयोग्य झाली आहेत.
ऊस व मका असे उंच वाढणारी पिके जमीन गाळयुक्त झाल्याने हवेने जमिनीवर भूई सपाट होवून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे,तयार झालेला कांदा पिकात पाणी साठल्याने तो जमिनीतच सडून गेला आहे.
डाळिंब,संत्री,मोसंबी असे फळबागा मध्ये फळांचा जमिनीवर सडा पडला आहे.कोरोना संसर्गामुळे बाजारपेठे बंद असल्याने आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी आता अतिवृष्टी मुळे पुन्हा एकदा दुहेरी संकटात सापडला असून राज्य व केंद्र सरकार कडून मदतीची मागणी केली जात आहे.