पतसंस्था चळवळीला बळकटी देण्याचा प्रयत्न करणार – जयंत पाटील

मुंबई दि. २५ अॉगस्ट – महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन यांच्या समवेत कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊनच्या कालावधीत राज्यातील पतसंस्थाना आलेल्या अडचणी राज्याचे जलसंपदामंत्री आणि सध्या प्रभारी चार्ज असलेले सहकार मंत्री जयंत पाटील यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जाणून घेतल्या.
राज्यात कार्यरत असणार्या २२ हजार पतसंस्थांमध्ये ४.५ लाख कर्मचारी काम करत असून सहकार क्षेत्रातील पतसंस्था चळवळीला बळकटी देण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मागण्या फेडरेशनने यावेळी मांडल्या. प्रलंबित प्रश्नांसाठी लवकरच बैठक आयोजित करण्यात येईल असे आश्वासन मंत्री जयंत पाटील यांनी दिले. पतसंस्थांना एका वेबपोर्टलवर आणून १०१ चे दाखले आॅनलाईन देण्याचे, शासकीय कागदपत्रांकरीता पतसंस्थांना शासकीय कार्यालयात माराव्या लागणाऱ्या फेऱ्या कमी करण्याचा प्रयत्न करू असे सांगतानाच अहमदनगर जिल्ह्याप्रमाणे इतर जिल्हयातील पतसंस्थांनी जिल्हानिहाय स्थैर्य निधी उभा करण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन मंत्री जयंत पाटील यांनी केले. यावेळी मंत्री जयंत पाटील यांनी येत्या पाच दिवसात हे संपूर्ण प्रश्न सोडविण्यासाठी मंत्रालय पातळीवर उच्चस्तरीय बैठक आयोजित करून ताबडतोब निकाली लावण्याच्या दृष्टिकोनातून आश्वासन दिले व तशा प्रशासनाला सूचनाही केल्या.या बैठकीला सहकार आयुक्त शेखर गायकवाड, महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, प्रदेश उपाध्यक्ष सांगलीचे सुरेश पाटील, सुरेश वाबळे, सर्जेराव शिंदे, सुरेखा लवांडे, संग्राम पाटील, लक्ष्मण गायकवाड, रवींद्र बोरावके, रमेश शिंगटे, विशेष कार्य अधिकारी संतोष पाटील आदी उपस्थित होते.