पंतप्रधान शिंजो आबेचा राजीनामा


टोकियो: जपानचे पंतप्रधान शिंजो अबे यांनी प्रकृतीच्या कारणास्तव पदाचा राजीनामा दिला आहे. शिंजो अनेक महिन्यांपासून आजारी आहेत. त्यांना अनेकदा रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे. त्यामुळेच अबे यांनी पंतप्रधान पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. शिंजो अबे यांना गेल्या आठवड्याभरात दोनदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अबे यांनी राजीनामा दिल्यानं जपानचा शेअर बाजार कोसळला
जपानचे पंतप्रधान शिंजो आबे हे प्रकृतीच्या कारणांमुळे पदाचा राजीनामा देणार असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून सुरू झाल्या होत्या. दिवसोंदिवस प्रकृती खालावत चालल्याने त्याचा परिणाम सरकारवर आणि सरकारी कामावर होऊ नये यासाठी आबे यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला असल्याचंही वृत्त होतं.
अखेर आज शिंजो आबे यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. दीर्घ आजारानं त्रस्त असलेले शिंजो आबे पंतप्रधान पदाचा राजीनामा देताना भावूक झाले. “दीर्घ आजारामुळे आपण पंतप्रधान पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मी जनतेची मनापासून माफी मागतो. कारण मी माझं कर्तव्य पार पाडण्यास सक्षम नाही. मी काही उद्दिष्ट निश्चित केली होती. ती पूर्ण होण्याआधीच राजीनामा द्यावा लागत असल्यानं मनाला वेदना होत आहेत,” अशा भावना आबे यांनी व्यक्त केल्या.