नोटीस बाबत अशी दिली शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आयकर विभागाने नोटीस पाठवून निवडणूक प्रतिज्ञापत्राबाबत स्पष्टीकरण मागवलं आहे. शरद पवार यांनीच याबाबत माहिती दिली. या नोटीसविषयी विचारलं असता देशात आमच्यावर विशेष प्रेम असल्याची प्रतिक्रियाही त्यांनी आज पत्रकार परिषद मध्ये दिली.
नोटीस आधी मला आली, आता सुप्रियाला येणार आहे असे कळलं, चांगली गोष्ट आहे. सुप्रियाला काल संध्याकाळी नोटीस येणार होती. संपूर्ण देशात आमच्यावर विशेष प्रेम आहे याचा आनंद आहे. मला काल नोटीस आली असून काही बाबतीत स्पष्टीकरण मागवलं आहे.
निवडणूक आयोगाच्यासांगण्यावरुन मला ही नोटीस आली आहे. त्याचं उत्तर लवकरच मी देईन, कारण उत्तर दिलं नाही तर दिवसाला १० हजारांचा दंड असल्याचा उल्लेख नोटीसमध्ये आहे. २००९, २०१४ आणि २०१९ या निवडणुकीत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राबाबत ही नोटीस मला मिळाली आहे असे शरद पवार यांनी सांगितले.
इतकंच नाही तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे तसंच सुप्रिया सुळे यांनाही नोटीस मिळल्याचं पवारांनी सांगितलं. राजकीय विरोधकांना आयकर विभागाकडून नोटीस पाठवून केंद्र सरकार आपला एक विशेष अजेंडा राबवत असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला.
पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी कृषी विधेयकावरुन राज्यसभेत झालेला गोंधळ, खासदारांचं निलंबन याविषयी आपली प्रतिक्रिया दिली. आणि उपसभापती हरिवंश राय यांच्यावरही टीका केली. निलंबित खासदारांच्या समर्थनार्थ आज दिवसभर अन्नत्याग करणार असल्याचं शरद पवारांनी जाहीर केलं आहे.