
अहमदनगर – महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतिपदावर कोणाची वर्णी लागते याकडे सर्व नगरकरांचे लक्ष लागले आहे. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसची सरकार आहे. ही महाविकास आघाडी स्थानिक पातळीवरही दिसेल का हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे स्थायी समितीचे सभापतिपद युतीला मिळते की महाविकास आघाडीला, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
स्थायी समितीच्या सभापतींची निवड व्हावी, अशी मागणी होत होती. परंतु लॉकडाउनमुळे निवड होत नव्हती. अखेर स्थायी समितीतील रिक्त पदे भरून विभागीय प्रस्ताव पाठविण्यात आला. विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकारी राहुल त्रिवेदी यांना अधिकारी म्हणून नियुक्त केले जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे.
आजपर्यंत एकही अर्ज दाखल झालेला नाही. शुक्रवारी २५ सप्टेंबर रोजी स्थायी समितीचा सभापती ऑनलाइन निवडणुकीतून निवडला जाईल.सभापतिपदासाठी भाजपचे मनोज कोतकर इच्छुक आहेत. ते आमदार जगताप यांचेही विश्वासू समजले जातात. शिवसेनेकडून विजय पठारे, श्याम नळकांडे यांची नाव चर्चेत आहे.
सभापतिपदासाठी शिवसेनेचे स्थानिक नेते महाविकास आघाडीतील नेत्यांना साकडे घालत आहेत. त्यामुळे जगताप मित्रत्वाला जागतात, महाविकास आघाडीचा धर्म पाळतात, की आणखी काही वेगळा निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे. महापौर व विरोधी पक्षनेतेपद सावेडीत आहे; मात्र स्थायीचे सभापतिपद केडगावला मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.