नगरपरिषद निवडणूकीसाठी सर्वच राजकीय पक्षात चाचपणी सुरु

0 8

जामखेड – नगरपरिषद निवडणूकीसाठी प्रभाग निहाय आरक्षण व रचना स्पष्ट झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपने नवीन उमेदवाराचा शोध घेण्यासाठी चाचपणी सुरु केली आहे. तर शिवसेना, कॉंग्रेस महाविकास आघाडीसाठी प्रयत्नशील आहे वंचीत बहुजन आघाडी, स्वाभिमानी पक्ष, मनसे, रासप भाजप राष्ट्रवादीच्या इच्छुकावर लक्ष ठेवून आहे. आ. रोहीत पवार, माजी मंत्री राम शिंदे यांच्या बरोबरच आ. सुरेश धस यांची भूमिका या निवडणुकीसाठी महत्त्वाची असल्याने अनेक इच्छुक आष्टीला जात आहे.

नगरपरिषद निवडणूकीचे पडघम वाजू लागले तसतसे सर्वच राजकीय पक्षांनी मेळावे घेऊन निवडणूक लढविणार असल्याचे संकेत दिले आहेत. नगरपरिषद निवडणूक मिनी आमदारकीची निवडणूक असल्याने सत्ता काबीज करण्याच्या दृष्टीने डावपेच आखले जात आहे. विद्यमान नगरसेवकांचा विकासाच्या नावाखाली सातत्याने होत असलेली कोलांटउडी यामुळे राजकीय पक्षांनी  नवीन तरूणांना संधी देण्याची तयारी ठेवली आहे.

 अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या तीन ट्रक १४ ब्रास वाळू पोलीसांकडून जप्त 

आ. रोहीत पवार यांनी मागील दोन महीन्यांपासून शहरात स्वच्छता अभियान, विंचरणा नदीचे पालटलेले रूप व उजनी धरणातून पिण्याच्या पाण्याची योजना असे मुद्दे घेऊन तसेच भविष्यातील विकासकामे याबाबत भूमिका मांडत आहेत याबाबत तरूणांमध्ये त्यांचे विशेष आकर्षण आहे तसेच प्रशासनाची घडी व्यवस्थित बसवून तरूण अधिकारी व कामाची आवड असलेले अधिकारी आणून थेट जनतेशी संवाद साधला जात आहे. आ. पवार यांनी प्रत्येक प्रभागात इच्छुकांची बैठक व अडचणी समजून घेऊन नगरपरिषदेचा आढावा घेऊन सक्रियपणा दाखवला आहे.  नगरपरिषदेच्या विविध प्रभागात १४ कोटी रुपयांचा निधी नगरविकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आणून टेंडर झाले आहेत. नवीन वर्षाच्या सुरुवातीला त्याचे भूमिपूजन होणार आहे.

माजी मंत्री राम शिंदे यांनी तालुक्यात जास्त फिरकले नसले तरी आपले लक्ष आहे यादृष्टीने भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहे. तीन नगरसेवक असताना त्यांनी साडेतीन वर्षे नगरपरिषदेची सत्ता हाती घेऊन शहरातील भुमिगत गटारे, सिमेंट कॉक्रेट रस्ते, ठिकठिकाणी गल्लीबोळात व बाजारतळात पेव्हीग ब्लॉक, खर्डा चौक ते तपनेश्वर मॉडेल रस्ता, छत्रपती शिवाजी पेठ, व कोर्ट रोड झालेला रस्ता व खर्डा चौक ते लक्ष्मी पार्क पर्यत चालू असलेला रस्ता यामुळे विकासकामे ठळक दिसत आहेत त्यामुळे भाजपसाठी ही जमेची बाजू आहे.

 

Related Posts
1 of 1,290

   हे पण पहा –    रेखा जरे हत्याकांड प्रकरणी संपूर्ण नगर जिल्हा गप्प का? 

नगरपरिषदेचेच्या मागील निवडणुकीत आ. सुरेश धस यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा होती व ती त्यांनी यशस्वी निभावून तत्कालीन मंत्री राम शिंदे यांच्या पॅनेलचा पराभव करून एकहाती सत्ता नगरपरिषदेत स्थापन केली होती वर्षभरानंतर नगरसेवकांनी साथ सोडली व ते काही दिवसांनी भाजपमध्ये आले. मागील नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने त्यांचा तालुक्यात झालेला प्रवेश घट्ट नाते करून गेला आहे. आता या निवडणुकीत  त्यांच्या शिवाय पान हलणार नाही हे सर्वश्रुत आहे. ज्या विद्यमान नगरसेवकांना राष्ट्रवादी व भाजपकडून संधी मिळणार नाही असे नगरसेवक व इच्छुक नगरसेवक पाठींबा मिळावा म्हणून आष्टी येथील निवासस्थानी हेलपाटे मारत आहेत. आ. सुरेश धस हे भाजपमध्ये असल्याने माजी मंत्री राम शिंदे यांना आ. धस यांची साथ मिळणार आहे.

वंचीत बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष डॉ. अरूण जाधव यांनी महिनाभरात चार ते पाच आंदोलन जनतेच्या प्रश्नावर करून लक्ष वेधले आहे. स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे तालुकाध्यक्ष मंगेश आजबे यांनी नगरपरिषदेच्या हद्दीत रोजगार हमी योजना सुरू करावी, शहर व वाडी-वस्तीसाठी असणारी मालमत्ता कर याबाबत तफावत याकडे लक्ष वेधले आहे. तर युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष राहुल उगले यांनी नागरिकांच्या समस्या मुख्याधिकारी यांच्याकडे मांडून सोडवणूक केली आहे व कोरोना काळातील शास्ती माफी करावी म्हणून वरीष्ठ पातळीवरून प्रयत्न सुरू केले आहेत.

नगरपरिषद निवडणूकीत सर्वच राजकीय पक्ष आपले लक्ष ठेवून आहेत. शिवसेनेचे तालुकाप्रमुख संजय काशिद यांनी स्वतंत्र मेळावा घेऊन स्वबळावर लढण्याची तयारी केली आहे. भाजप व राष्ट्रवादी वगळता काही पक्ष व संघटना तिसऱ्या आघाडीचा फॉर्म्युला वापरण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: