
मुंबई – महाराष्ट्रातील राजकारणात पहाटेचा योग एकदाच आला आणि तो ही काही चांगला नव्हता. त्यामुळे नव्या घडामोडींसाठी पहाटेची कुंडली, मुहूर्त कोणी मांडू नयेत. महाराष्ट्राचे सरकार पुढची साडेचार वर्षे निश्चित आरामात चालेल. पुढील साडेचार वर्षे पहाटेचा एकही राजकीय मुहूर्त पंचांगात नाही अशा टोला शिवसेनेनं सामना मधून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लावला .
२ दिवस पूर्वी शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत एका हॉटेल मध्ये भेट झाली होती . त्यावरून राजकीय चर्चेला उधाण आलं होतं. राऊत आणि फडणवीस या दोघांनीही यात राजकीय काही नसल्याचा खुलासा प्रसार माध्यमांसमोर येऊन स्पष्ट केले होते. चंद्रकांत पाटील यांनी सूचक वक्तव्य करून या भेटीचे गूढ वाढवले होते.
यावरूनच आजच्या सामनाच्या अग्रलेखातून चंद्रकांत पाटीलचा चांगलाच समाचार शिवसेने घेतला आहे. फडणवीस आणि राऊत यांच्या अचानक भेटीमुळे एखाद्या फाइन मॉर्निंगला राजभवनावर जाऊन काहीतरी घडवता येईल असे चंद्रकांत पाटलांना वाटत असेल तर ते भ्रमात आहेत. हे काही चांगल्या प्रकृतीचे साइन नाही. एकतर अशा फाइन मॉर्निंगचा अचानक प्रयोग भाजपने याआधी केलाच आहे पण त्या फाइन मॉर्निंगला जे घडले ते पुढच्या ७२ तासांत दुरुस्त झाले.
याचे भान सध्या फक्त देवेंद्रबाबूंनाच आहे. भाजपला महाराष्ट्राचे सरकार पाडण्याची घाई नाही आणि हे सरकार अंतर्विरोधानेच पडेल असे फडणवीस सांगत आहेत आणि त्याचवेळी एखाद्या फाइन मॉर्निंगला काहीतरी घडेल असा मंतरलेला संदेश चंद्रकांत पाटील देत आहेत. लोकांनी आता काय समजायचे? असा सवाल शिवसेनेन सामनाच्या अग्रलेखातुन केला आहे.