खासगी बस चालकांशी सरकारचं साटलोटं : दरेकरांचा आरोप


मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणवासी मोठ्या संख्येने आपल्या गावी जातात. पण सरकारच्या ठिसाळ नियोजनामुळे उशीरा सुरु केलेल्या ट्रेनला अत्यल्प प्रतिसाद मिळाला. त्यामुळे सरकारचं खासगी बस चालकांशी काही साटलोटं असल्याचा आरोप भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी केलाय. कोकणवासीयांना ई पास मिळणं कठीण झालंय. राज्य सरकारनं रेल्वे आणि एसटी सुरू केली मात्र वराती मागून घोडे होते. ९ ऑगस्टला केंद्र सरकारनं रेल्वे सोडायला परवानगी दिली. तेव्हा एसटी आणि रेल्वेनं चाकरमानी गावी जाऊ शकले असते मात्र राज्य सरकारचा नियोजनाचा अभाव असल्याचा आरोप दरेकरांनी केलाय. क्वारंटाईनमुळे चाकरमानी पगाराला मुकले याला सरकार जबाबदार आहे.सरकरानं १२ ऑगस्टपर्यंत गावी पोहचायला सांगितलं आणि १३ ऑगस्टपासून टोल माफी केली. ज्या कोकणवासीयांनी शिवसेनेला सत्ता मिळवून दिली, सेनेला भरभरून दिलं त्यांच्याकडेच शिवसेनेचे दुर्लक्ष होत असल्याचे दरेकर म्हणाले.