कोव्हिड सेंटरमधून तरुणी बेपत्ता; नातेवाईकांचे आमरण उपोषण !

एकीकडे कोरोनाचे संकट असताना दुसरीकडे पुण्यातील जंबो कोव्हिड सेंटरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे . आधीच या हॉस्पिटलमधून कित्येक धक्कादायक घटना समोर आल्या आहेत . आता एक तरुणी या कोव्हिड सेंटरमधून बेपत्ता झाली आहे , त्यामुळे याठिकाणचा गोंधळ पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.बेपत्ता झालेल्या तरुणीचे वय ३३ वर्षे आहे .
या प्रकारानंतर हॉस्पिटल चा भोंगळ कारभार समोर आला आहे . संबंधित तरुणीला ससून रुग्णालयातून कोव्हिड सेंटरमध्ये दाखल केले होते.बरी झाल्यानंतर त्या तरुणीचे नातेवाईक तिला घरी घेऊन जाण्यासाठी आले. मात्र तुमची मुलगी येथे ऍडमिट झालीच नव्हती असं जंबो कोव्हिड सेंटर मधून सांगण्यात आले.
झाल्या प्रकारानंतर संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयाविरोधात आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला.बेपत्ता तरुणीच्या आईने आपल्या मुलीचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त करत आमरण उपोषण आंदोलन सुरू केले आहे.माझी मुलगी परत मिळाल्याशिवाय मी हे उपोषण सोडणार नाही. माझी मुलगी मला जिवंतच मिळाली पाहिजे अशी मागणी मुलीच्या आईने केली आहे .