कृषी विधेयक महाराष्ट्रात लागू होणार नाही – अजित पवार

मुंबई – संपूर्ण देशभरात कृषी विधेयक आणि कामगार कायद्यातील बदल यामुळे मोठा गहजब उडाला आहे. याप्रकरणी आंदोलन सुरू झालेले आहेत. अशावेळी महाराष्ट्रात हे दोन्ही कायदे न राबवण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करून टाकली आहे.
सध्या देशभरात कृषी आणि कामगार विरोधी कायदे आणले जात असल्यामुळे केंद्र सरकार विरोधात आंदोलन सुरु आहे. आज देशातील २०० पेक्षा अधिक शेतकरी संघटना एकत्रिपणे भारत बंद आंदोलन करत आहेत. संसदेत पारित झालेल्या कामगार आणि कृषी विधेयकामुळे देशातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. विरोधी पक्ष हे कायदे कसे चुकीचे आहे हे सांगत असताना सत्ताधारी पक्ष मात्र हे कायदे कसे हितकारक आणि कल्याणकारी आहे, हे पटवून देत आहे.
अशातच महाराष्ट्र सरकारने या कायद्यांविषयी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शेतकरी कृषी विधेयक आणि कामगार कायद्यात केलेले बदल महाराष्ट्रात लागू करणार नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्पष्ट केले आहे.एकूणच यामुळे महाराष्ट्र आणि केंद्र सरकार यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा शिगेला जाईल हे निश्चित.