किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली नगर शहरात काँग्रेसला नवसंजीवनी मिळेल.


नगर : किरण काळे यांच्या रूपाने नगर शहर काँग्रेसला आजपर्यंतचा सर्वात तरुण शहर जिल्हाध्यक्ष मिळाला आहे. या शहरासाठी काहीतरी करण्याची जिद्द, धडपड त्यांच्यामध्ये असून त्यांच्या निर्भिड स्वभावातून आणि संघटन कौशल्यातुन नगर शहरात काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी मिळेल असा, असे प्रतिपादन काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रा. श्रीकांत बेडेकर यांनी केले आहे.
काँग्रेस पक्षाच्या वतीने स्व. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त सद्भावना सप्ताहाचे राज्यभरात आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने ‘भारतरत्न माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांचे आधुनिक भारताच्या निर्माणातील योगदान’ या विषयावरील परिसंवादाच्या कार्यक्रमामध्ये प्रा. बेडेकर बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे, नगर शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, माजी महापौर दीप चव्हाण, जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे, अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष अज्जूभाई शेख, महिला काँग्रेसच्या नलिनी गायकवाड, जरीना पठाण, रजनीताई ताठे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष मयूर पाटोळे, विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष दानिश शेख, सेवादल काँग्रेसचे शहर अध्यक्ष डॉ.अमोल लोंढे, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष सुरेश झावरे, प्रशांत वाघ, चंद्रकांत उजागरे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रा. बेडेकर म्हणाले की, नगर शहरामध्ये काँग्रेस पक्षाला मानणारा मोठा वर्ग आहे. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये संघटनात्मक कामाला मरगळ आल्यामुळे कार्यकर्ते विखुरले होते. परंतु या शहरातील काँग्रेस पक्षाचा मतदार काँग्रेस विचारधारे सोबत आजही कायम आहे. किरण काळे यांच्या माध्यमातून या सर्व विखुरलेला कार्यकर्त्यांना एकत्र येण्यासाठी आता सक्षम नेतृत्व मिळालेल आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये काळे यांच्या नेतृत्वात जोरदार संघटना नगर शहरामध्ये निश्चित उभी राहील.
प्रा. बेडेकर पुढे म्हणाले की, देशामध्ये तंत्रज्ञानाचे युग हे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यामुळे आले. संगणक क्रांती, मोबाईल क्रांती त्यांच्यामुळेच झाली. आज त्यामुळेच सोशल मीडियाच एवढं मोठं व्यासपीठ तरुण पिढीला उपलब्ध झालं आहे. परंतु भाजप सरकारच्या काळामध्ये काँग्रेस पक्षाने मागच्या सहा-सात दशकांमध्ये देशाच्या उभारणीचे केलेलं काम जनतेपर्यंत पोहोचू दिले नाही.
नगर शहरात काँग्रेसने हे काम सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याच काम केलं पाहिजे. यामुळे काँग्रेस पक्षापासून काहीशी दूर गेलेली युवापिढी ही पुन्हा काँग्रेस विचारधारेशी जोडली जाईल आणि त्यातूनच नगर शहरामधील काँग्रेस अधिकाधिक बळकट होईल, असा आशावाद यावेळी प्रा.बेडेकर यांनी व्यक्त केला.
यावेळी जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफरे म्हणाले की, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी या देशामध्ये विकासाची मुहूर्तमेढ रोवत तळागाळातील सर्वसामान्य घटकाला बळ देण्याचं काम केलं.
शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे म्हणाले की, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजितदादा तांबे, आ. डॉ. सुधीर तांबे यांच्या नेतृत्वाखाली नगर शहरामध्ये काँग्रेस बळकट करण्यासाठी मी काम करणार असून सर्वांना बरोबर घेत जुन्या नव्यांचा मेळ घालत संघटना बांधणी करणार आहे. नलिनी गायकवाड यांनी आभार मानले.
यावेळी प्रवीण गीते, गणेश भोसले, योगेश काळे, डॉ. साहिल सादिक, दीपक घाडगे, सागर जाधव, राहुल पवार, गणेश आपरे आदींसह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.