काश्मीरमध्येही फिल्मसिटी सुरु करा शिवसेनाचा भारतीय जनता पक्षाला खोचक सल्ला

मुंबई – नुकतेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशात देशातील सर्वात मोठी फिल्मसिटी तयार करण्याच्या वक्तव्यानंतर सामना अग्रलेखातून त्यांच्या या वक्तव्याचा समाचार घेण्यात आला आहे. तसेच काश्मीरमध्येही फिल्मसिटी सुरु करा, असा खोचक सल्लाही भाजपला दिला आहे.
खरं तर 370 कलम हटवल्यानंतर केंद्राने कश्मिरात अशा एखाद्या फिल्मसिटीची योजना राबवायला हवी. एकेकाळी आमच्या सिनेजगतास चित्रीकरणासाठी काश्मीर, सिमला, मनाली, शिलाँग अशा भागांची भुरळ पडली होती. रोमॅण्टिक गाण्यांसाठी काश्मीर हे आवडते ठिकाण होते. तेथेही भव्य फिल्मसिटी उभारता येईलच. शेवटी प्रत्येकाने भारतीय सिनेसृष्टीत आपले योगदान दिलेच आहे. दादासाहेब फाळके व महाराष्ट्राने सिनेसृष्टीत सगळ्यांना समावून घेतले. हा उद्योग मोठा केला. त्यावर आता चिखलफेक सुरु आहे. पण इतर राज्येही मुंबईप्रमाणे सिनेउद्योगास चालना देणार असतील तर त्यांना शुभेच्छा’, असं सामना अग्रलेखात म्हटले आहे.
मुंबई म्हणजे चित्रपटसृष्टीची जन्मभूमी किंवा कर्मभूमी हे ठसवण्यात गेल्या शंभर वर्षात अनेकांचे योगदान आहे. कोल्हापुरात मराठी सिनेमे तर मुंबईत हिंदी सिनेमे वर्षानुवर्ष तयार होत आहेत. मुंबईस जी चमक-धमक मिळत असते त्यात मायानगरीचे अस्तित्व हे कारण आहेच. मात्र गेल्या काही महिन्यांपासून या मायानगरीस बदनाम करण्याचे, तिचे खच्चीकरण करण्याचे, त्यात काम करणाऱ्या प्रमुख मंडळींवर दाबदबाव टाकण्याचे प्रयोग सुरु झाले आहेत. जणू काही सिनेउद्योगाने व त्यात काम करणाऱ्या चमकदार मंडळींनी मुंबई सोडून जावे, असे वातावरण निर्माण केले जात आहे का, अशी शंका येऊ लागली आहे’, असंही सामना अग्रलेखात म्हटले आहे.