काँग्रेस वर्किंग कमिटीमध्ये महाराष्ट्रातून यांना मिळाली जबाबदारी

नवी दिल्ली – काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी(cwc) काँग्रेसच्या कार्यकारी समितीची यादी ११ सप्टेंबर रोजी जाहीर केली.गुलाम नबी आझाद आणि मल्लिकार्जून खर्गे यांच्यासह चार ज्येष्ठ नेत्यांना सरचिटणीस पदाच्या पदावरून काढण्यात आलं आहे. काँग्रेस वर्किंग कमिटीतील नेत्यांच्या यादीत महाराष्ट्रातून फक्त मुकुल वासनिक यांचा समावेश करण्यात आला आहे .
परंतु कायम निमंत्रित सदस्यांमध्ये महाराष्ट्रातून राज्यसभा खासदार राजीव सातव आणि रजनी पाटील यांना संधी देण्यात आली आहे. त्याशिवाय, सोनिया गांधी यांनी पक्षाचं संघटनात्मक कामकाज आणि इतर मदतीसाठी एक विशेष समितीसुद्धा बनवली आहे.तसंच AICC सेंट्रल इलेक्शन ऑथरिटीमध्येही मोठे बदल करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी अनेक ज्येष्ठ नेत्यांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना पक्षात बदल करण्याबाबत पत्र लिहिलं होतं.
गुलाम नबी आझाद यांना सरचिटणीस पदावर हटवण्यात आलं असलं तरी त्यांना वर्किंग कमिटीमध्ये स्थान देण्यात आले आहे. काँग्रेस अध्यक्षांना लिहिलेल्या वादग्रस्त पत्रावर जितेन प्रसाद यांचीही स्वाक्षरी होती. त्यांना राज्य प्रभारी बनवण्यात आलं आहे. त्यांना उत्तर प्रदेशहून पश्चिम बंगालला पाठवण्यात आलं आहे. पुढच्या वर्षी तिथं निवडणुका होणार आहेत.काँग्रेसमधील या बदलाचा फायदा पक्षप्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांना झाला. सुरजेवाला आता काँग्रेस अध्यक्षांना सल्ला देणाऱ्या सहा सदस्यीय विशेष समितीचा भाग असतील. तसंच त्यांच्यावर काँग्रेसच्या सरचिटणीस पदाची जबाबदारीही सुध्दा देण्यात आली आहे.रणदीप सुरजेवाला यांना कर्नाटकचे प्रभारी बनवण्यात आलं असून प्रियंका गांधी यांना पूर्ण उत्तर प्रदेशच्या प्रभारी पदाची जबाबदारी मिळाली आहे.
महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते मुकुल वासनिक यांना मध्य प्रदेशचं काम सोपवण्यात आलं. हरीश रावत यांना पंजाब, ओमान चंडी यांना आंध्र प्रदेश, तारीक अन्वर यांना केरळ आणि लक्षद्वीप, जितेंद्र सिंह यांना आसाम तर अजय माकन यांच्याकडे राजस्थानची जबाबदारी देण्यात आली आहे.के. सी. वेणूगोपाल यांच्याकडे पक्षसंघटनाची जबाबदारी सोपवण्यात आली, तर मधुसूदन मिस्त्री यांना केंद्रीय निवडणूक समितीच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आलं आहे. राहुल गांधींचे विश्वासू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मनकीन टागोर यांना तेलंगणच्या प्रभारीपदी नियुक्त करण्यात आलं आहे.