
कर्जत- कर्जत नगरपंचायत निवडणुकीत स्वबळावर लढू विधानसभेच नंतर पाहू कामाला लागा अशा सुचना राज्याचे महसूलमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी कर्जत येथे बोलताना काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांना दिल्या.
कर्जत नगरपंचायतीच्या आगामी होणार असलेल्या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर कर्जत तालुका युवक काँग्रेसच्या वतीने प्रभाग तेथे काँग्रेस व गाव तेथे काँग्रेस या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या संकल्पनेतील गांव तेथे काँग्रेस हे अभियान राज्यात कर्जत शहराने राबविले आहे.
याबद्दल बाळासाहेब थोरात यांनी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सचिन घुले पाटील यांचे कौतुक केले आणि हा प्रयोग राज्यभर राबविण्यात येईल असे जाहीर केले. ते म्हणाले काँग्रेस पक्षावर अनेक वेळी संकट आले परंतु प्रत्येक वेळी हे पक्ष त्या संकटातून निघाला आहे. कर्जत नगरपंचायत निवडणुकीत प्रत्येक कार्यकर्त्याला संधी मिळेल तुम्ही कामाला लागा मी तुमच्या पाठीशी आहे अशी भूमिका त्यानी मांडली आहे .
नगरपंचायतीच्या आगामी निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढेल असे जाहीर करताना आपण येथील युवकांना आशिर्वाद देऊ असे जाहीर केले. यावेळी कर्जत तालुक्यातील काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.