ऑक्टोंबर मध्ये उघडू शकते रेस्टॉरंट मुख्यमंत्र्यांनी दिले संकेत

मुंबई – राज्यामधील रेस्टॉरंट पुन्हा सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे तयार होत आहेत. ती अंतिम झाल्यानंतर लगेच रेस्टॉरंट सुरु करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिली.
मुख्यमंत्र्यांनी आज मुंबई ,पुण्यासह औरंगाबाद आणि नागपूरमधील रेस्टॉरंट व्यावसायिक संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करत होते. त्या वेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना ते म्हणाले कोव्हिडवर लस किंवा औषध उपलब्ध नाही. त्यामुळे कोरोनासोबत जगताना अत्यंत काळजीपूर्वक पुढे जावं लागत आहे. रुग्णांमध्ये पोस्ट कोव्हिड लक्षणं दिसून येत आहेत. आर्थिक बाबींसाठी जबाबदारीने आपण काही पावलं टाकायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत अनेक व्यवहार बंद होते ते सरकारने एक-एक करुन सुरु केली आहे.
व्यवहार बंद ठेवणे हा आम्हाला सुद्धा आवडत नाही. कारण यामुळे महसूल मिळत नाही. केंद्र शासनाकडून जीएसटीची काही हजार कोटी रुपयांची रक्कम मिळणे बाकी आहे. या सर्व आर्थिक अडचणींची जाणीव असल्याने मर्यादा पाळून आणि जबाबदारीचे भान ठेऊन व्यवहार सुरळीत करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
अवघा महाराष्ट्र माझे कुटुंब आहे, त्यात हॉटेल-रेस्टॉरंट व्यावसायिकही आलेच. जशी माझी जबाबदारी इतरांप्रमाणे तुमच्याप्रती आहे, तशीच तुमची जबाबदारी ही तुमच्या ग्राहकांसाठी आणि तुमच्या रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांप्रती आहे असे ते म्हणाले.