उमर खालिद याला दिल्ली दंगली प्रकरणात अटक

नवी दिल्ली – फेब्रुवारी महिन्यात ईशान्य दिल्लीत झालेल्या हिंसाचारप्रकरणात पोलिसांनी काल रात्री ‘जेएनयू’चा माजी विद्यार्थी नेता उमर खालिद याला अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्यावर गैरकृत्य प्रतिबंधक कायद्याखाली (UAPA) गुन्हा दाखल केला आहे. रविवारी तब्बल ११ तासांच्या चौकशीनंतर उमर खालिदला दिल्ली पोलिसांनी अटक केली.
स्पेशल सेलने यापूर्वीही उमर खालिदची चौकशी केली होती. चौकशी दरम्यान स्पेशल सेलने जेएनयूचा माजी विद्यार्थी उमर खालिद याला दंगलीबद्दल अनेक प्रश्न सुध्दा विचारले होते. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौर्यापूर्वी केलेल्या भाषणाबद्दलही उमर खालिद याची चांगलीच चौकशी केली होती.
उमर खालिदच्या अटकेनंतर ‘युनायटेड अगेन्स्ट हेट ग्रुप’ने एक निवेदन जारी केले आहे. यामध्ये म्हटले आहे की, ११ तासांच्या चौकशीनंतर दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने उमर खालिदला दिल्ली दंगल प्रकरणातील सूत्रधार म्हणून अटक केली आहे. दिल्ली पोलिस हिंसाचाराच्या तपासाच्या नावाखाली हिंसक आंदोलनांना चालना देत आहेत. त्याचा मोबाईलही पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
नागरिकत्व (दुरुस्ती) कायद्याचे समर्थक आणि कायद्याविरोधात समर्थक यांच्यात झालेल्या हिंसाचारानंतर ईशान्य दिल्लीत जातीय संघर्ष सुरू झाला होता आणि त्यात किमान ५३ लोकांचा मुत्यू झाला होता आणि सुमारे २०० जण जखमी झाले होते.