ई- पास राहणार की जाणार?

मुंबई – महाराष्ट्रात लॉकडाऊन पासून सुरू असलेल्या ई- पास हे रद्द करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे.
अनलॉक ४ ची नियमावली जाहीर करताना राज्य सरकार ई- पास रद्द करण्याच्या विचार करत आहे, याबाबत माहिती सुत्रांनी दिली. लॉकडाऊन लागू केल्यापासून सध्या राज्यात प्रवासासाठी ई-पास अनिवार्य आहे. ई-पास रद्द करा याची मागणी खूप दिवसा पासून होत होती. तर ई-पास चालू ठेवणं म्हणजे केंद्र सरकारच्या नियमावलीचं उल्लंघन असेल, असंही केंद्र सरकारने बजावलं आहे.
नुकतंच आंतरजिल्हा आणि आंतरराज्य प्रवासासाठी कोणत्याही वेगळ्या परवानगीची गरज नसल्याचं केंद्रने स्पष्ट केले होते. केंद्र सरकारने यापूर्वीच नियमावली जाहीर करत ई-पास प्रणाली बंद करण्याचे निर्देश सर्व राज्यांना दिले होते. शिवाय कंटेन्मेंट झोन वगळता स्थानिक स्तरावर कुठेही वेगळे निर्बंध केले तर, हे केंद्र सरकारच्या नियमांचं उल्लंघन असेलअसंही स्पष्ट केले आहे.
सोमवारी ई-पासबाबतचे नियम जाहीर होणार आहेत. केंद्र सरकारने राज्यांना मेट्रो सेवा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यास सांगितलं आहे अशी माहिती सुत्रांनी सांगितले आहे. दरम्यान, मुंबईत मेट्रो आणि मोनो रेल सुरू करण्याबाबत अजून कोणतीही चर्चा नसल्याची माहिती सामोर येत आहे. यावर राज्य सरकारच अंतिम निर्णय घेणार असल्याचं मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त आरए राजीव यांनी सांगितलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सद्यपरिस्थितीत लोकल ट्रेन आणि मेट्रो सेवा सुरू करण्याच्या विरोधात असल्याचं बोललं जातं. तर मुख्य सचिव संजय कुमार आणि इतर अधिकाऱ्यांनी लोकल ट्रेनची संख्या वाढवण्याची मागणी केली आहे.