आरपीआयच्या वतीने खाजगी रुग्णालय व लॅबमध्ये कोरोना चाचणीसाठी विनामुल्य शासकीय केंद्र सुरु करण्याची मागणी

अहमदनगर – कोरोना चाचणीसाठी शासकीय रुग्णालयाचा भार कमी होण्यासाठी खाजगी रुग्णालय व लॅबमध्ये कोरोना चाचणीसाठी विनामुल्य शासकीय केंद्र सुरु करावी आणि या संकटकाळात सर्व खाजगी रुग्णवाहिका ताब्यात घेऊन त्यांना नाममात्र दर ठरवून देण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने करण्यात आली.
शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असताना जास्तीत जास्त कोरोना चाचणी होणे गरजेची आहे. टाळेबंदी काळात रोजगार, उद्योग बंद असून सर्वसामान्य नागरिक आर्थिक संकटात असल्याने त्याला कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची कोरणा चाचणी खाजगी लॅबमध्ये करून घेणे अशक्य आहे. शासकीय रुग्णालयात जरी चाचणी मोफत असली तरी गर्दी होण्याचे प्रमाण जास्त असून, तेथे संसर्ग होण्याची शक्यता आहे. तेथे फिजिकल डिस्टन्स पालन होत नाही. कित्येक वेळा शासकीय रुग्णालयातून निगेटिव रिपोर्ट असलेला रुग्ण काही दिवसात पॉझिटिव्ह झालेला असतो.
प्रशासनाने खाजगी रुग्णालय व लॅबला ठरवलेले दर अदा करुन नागरिकांना कोरोना चाचणी मोफत उपलब्ध करून दिल्यास संसर्गाचा धोका कमी होऊन जास्तीत जास्त चाचण्या होऊ शकतात. रुग्ण पॉझिटिव्ह आही की निगेटिव्ह? या प्रश्नात उपचाराला उशीर होऊन अनेकांचे प्राण जात आहे. जिल्ह्यातील मृत्यूचे प्रमाण कमी करायचा असेल तर जास्तीत जास्त चाचणी आवश्यक आहे. तर रुग्णांना वेळेवर हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यासाठी रुग्णवाहिकांची गरज भासत असून, खाजगी रुग्णवाहिका मोठ्या प्रमाणात पैसे उकळत आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना खाजगी रुग्णवाहिका बोलवणे देखील परवडत नसल्याने सरकारी यंत्रणेवर मोठे ताण पडत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
जिल्हा प्रशासनाने खाजगी रुग्णालय व लॅबमध्ये नागरिकांना मोफत कोरोना चाचणीची सुविधा उपलब्ध करुन द्यावी, सर्व खाजगी रुग्णवाहिका प्रशासनाने ताब्यात घेऊन त्यांना नाममात्र दर ठरवून द्यावे, सर्व खाजगी दवाखान्यात कोरोनासाठी २० बेड राखीव ठेवून, १० बेड महात्मा फुले जन आरोग्य योजनेसाठी द्यावे, धर्मदाय आयुक्त नोंदणीकृत हॉस्पिटलची जिल्हा प्रशासनाने यादी जाहीर करण्याची मागणी आरपीआयच्या वतीने करण्यात आली आहे.
या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय येथे पोलीसांमार्फत पालकमंत्री यांना देण्यात आले. यावेळी आरपीआयचे उत्तर महाराष्ट्र सचिव अजय साळवे, युवकचे शहराध्यक्ष अमित काळे, मंगेश मोकळ, चंद्रकांत भिंगारदिवे, विनोद भिंगारदिवे, दया गजभिये, सागर कांबळे, युवराज पाखरे, अशोक भिंगारदिवे, शनैश्वर पवार, संदिप वाघचौरे, नरेश चव्हाण, सुधीर गायकवाड, सोन्याबापू सुर्यवंशी, मिथून दामले, अजय पाडळे, दिपक गायकवाड, सनी खरारे आदि उपस्थित होते.