DNA मराठी

अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भात राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न

0 197

मुंबई – अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भात राजभवन येथे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील कृषि, अकृषी विद्यापीठांच्या सर्व कुलगुरूंची ऑनलाईन बैठक संपन्न झाली. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत,  राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, अप्पर मुख्य सचिव राजीव जलोटा, परीक्षेसंदर्भात गठित केलेल्या समितीचे अध्यक्ष तथा मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर उपस्थित होते.

सर्वोच्च न्यायालय आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) मार्गदर्शक सूचनांनुसार १५ सप्टेंबरपासून सुरू करून ३१ ऑक्टोबरपर्यंत निकालासह परीक्षा प्रक्रिया पूर्ण करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच समितीचा अहवाल व्यवस्थापन परिषद आणि विद्यापीठाच्या परीक्षा मंडळासमोर ठेवून दोन दिवसात शासनास कळवावे आणि राज्य आपत्कालीन प्राधिकरणाची बैठक मंगळवारी घेण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती करावी अशी सूचना राज्यपालांनी केली.

परीक्षा पद्धतीसंदर्भात विद्यापीठांनी व्यवस्थापन परिषद आणि परीक्षा मंडळामध्ये परीक्षेसंदर्भात गठित केलेल्या समितीचा अहवाल सादर करून परीक्षा पद्धती निवडावी, असेही राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी सांगितले.

Related Posts
1 of 2,492

श्री. सामंत म्हणाले, राज्यपाल महोदय यांच्या अध्यक्षेतेखाली झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. लवकरच राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, यांच्या उपस्थितीत होईल. त्यानंतर विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) ३० सप्टेंबर पर्यंत परीक्षा घेण्याच्या मार्गदर्शक सूचना आहेत. यासंदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगाला पत्र पाठवून राज्यातील कोविड-१९ ची सद्याची परिस्थिती आणि परीक्षेसंदर्भातील नियोजन कळविण्यात येईल. असेही श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले.

या बैठकीत विद्यापीठांनी परीक्षा प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी, पुढील शैक्षणिक वर्ष लवकर सुरू करण्या संदर्भातील तयारी पूर्ण करावी. या बरोबरच एटीकेटीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेची प्रक्रिया वेळेत पूर्ण करुन अपवादात्मक परिस्थितीमध्ये विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिला तर अशा विद्यार्थांच्या परीक्षेचेसुद्धा नियोजन करण्यात यावे. या संदर्भात चर्चा करण्यात आली.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: