अंगणवाडी सेविकेमार्फत पोषण महिन्याच्या विविध कार्यक्रमाची अंमलबजावणी

0 45

अहमदनगर –   संपूर्ण देशात केंद्रीय महिला आणि बाल विकास विभाग यांच्या आदेशान्वये १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२० या संपूर्ण महिना  “पोषण महिना” म्हणून साजरा केला जात आहे. या महिन्यांमधील राबवले जाणारे विविध कार्यक्रम आणि  उपक्रमामधून लोकचळवळीद्वारे कुपोषणाप्रती लोकांचे वर्तन आणि व्यवहार यामध्ये परिवर्तन अपेक्षित आहे. या कार्यक्रमाचा मुख्य उददेश कुपोषण निर्मुलन हा आहे.

हा कार्यक्रम अहमदनगर जिल्ह्यात अतिशय प्रभावीपणे राबविण्यात येत असून  जिल्हयाला सलग दोनदा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे महिला आणि बाल विकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय कदम यांनी दिली. अहमदनगर तालुक्यातील शिराढोण येथे अंगणवाडी सेविकेमार्फत पोषण महिन्याच्या विविध कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात आली. अंगणवाड्यांमध्ये पोषण विषयक रांगोळी स्पर्धा आयोजित करून महिलांमध्ये जनजागृती निर्माण करण्यात आली. गरोदरमाता, स्तनदामाता, किशोरवयीन मुली आदींना पोषणाचे महत्व समजावून सांगितले. तसेच यात ग्रामस्तरावरच मिळणा-या रानभाज्या यांच्या पासून वेगवेगळे पोषक पदार्थ कसे बनवता येतील याबददल पर्यवेक्षिका आणि बालविकास अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.


तसेच ” कुपोषीत मुलांना ” सर्व साधारण श्रेणीत कसे आणावे. त्याचे आहाराचे वेळापत्रक कसे असावे याबददल मार्गदर्शन करण्यात आले. पोषण अभियानाच्या पंचसूत्रीनुसार लाभार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये एक हजार दिवस बाळाची आणि आईची काळजी कशी घ्यावी, डायरीयापासून मुक्ती, पौष्टिक आणि संपूर्ण आहार, ऍनिमियापासून मुक्ती, स्वच्छता आणि स्वच्छ पिण्याचे पाणी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

Related Posts
1 of 1,371

  अहमदनगर जिल्ह्यात अतितीव्र कुपोषित बालकांची संख्या ४५० होती. आरोग्य संहिता आणि आहारसंहितेद्वारे उपचार केल्यानंतर ३०० मुलांमध्ये सुधारणा झाली आहे. या अभियानांतर्गत आरोग्य उपकेंद्राच्या आरोग्य सेविकेमार्फत किशोरवयीन मुली, गरोदर माता आदींची तपासणी करण्यात आली. पोषण महिन्यांमध्ये विविध गावांमध्ये परसबागांची निर्मिती करण्यात आली. गरोदर माता स्तनदा माता आणि मुलांना पोषण आहाराचे वाटप करण्यात आले.


   जिल्ह्यात५ हजार ५५५ अंगणवाड्या असून , सर्व अंगणवाडी सेविकांना शासनामार्फत मोबाईल वितरित करण्यात आले आहेत. अंगणवाडी सेविका सॉफ्टवेअरद्वारे पोषण अभियानाची सर्व माहिती भरत असून भरलेली माहिती एकाच वेळी ही माहिती तालुका, जिल्हा, आणि राज्य पातळीवर कळते. त्यामुळे या अभियानाच्या कामाला वेग आला आहे. या महिन्यांमध्ये अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, एएनएम, पर्यवेक्षिका आदींनी दिलेल्या गृहभेटीमधून पूर्ण जिल्हाभर पोषणविषयक जनजागृती निर्माण झाली आहे. पोषण महिन्याच्या विविध उपक्रमातून मुलांच्या पोषण स्थितीत सुधारणा झाल्याने पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.अशी माहिती  जिल्हा परिषदेचे महिला आणि बाल विकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय कदम यांनी दिली.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: